COVID Relief

कोरोना महामारीमुळे अचानकपणे लागलेल्या टाळेबंदी दरम्यान वस्तीतील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या संकटात सापडली. बालसमृद्धी वर्ग बंद पडले, किशोरदर्पण प्रकल्पातील मुलामुलींना भेटणेही दुरापास्त झाले. महिलांचा रोजगार थांबला. अनेक अडचणी निर्माण झाल्या… कोरोनाच्या भीतीने आम जनता घरात स्वतःला कोंडून बसलेली असताना स्वानंदच्या कार्यकर्त्यानी मात्र स्वतःची काळजी घेत वस्तीत धान्याचे किट्स पोहचवण्याचे अवघड काम पूर्ण केले. तीसच्या वर वस्त्या आणि त्यातील आर्थिक दुर्बल घटकातील शेकडो कुटुंब यांच्यापर्यंत थेट सेवा कार्यकर्त्यांनी दिली. या सोबतच वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिरे, अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, आयुर्वेदिक काढा वाटप, सॅनिटरी नॅपकिन वाटप, मास्क वाटप, आयोजन करण्यात आले. आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांची नाव नोंदणी करण्यासाठी त्यांची झुंबड उडालेली असताना स्वानंदचे कार्यकर्ते पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीला धावून गेले. मजुरांची नावनोंदणी करून घेणे, त्यांच्या कागद पत्रांची छाननी करणे, त्यांना रांगेत, सुरक्षित अंतर ठेऊन नोंदणी करण्यास सांगणे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे ही कामे सर्वांनी केली.

टाळेबंदीदरम्यान समृद्धी वर्गातील शिक्षिका, समन्वयक वस्तीतील मुलांच्या सतत संपर्कात राहिले. त्यांनी या मुलाचं मनोधैर्य वाढवलं. १० × १० च्या खोलीत कुटुंबियांना घेऊन खेळता येतील असे खेळ समृद्धी वर्गाच्या शिक्षिकांनी मुलांना शिकवले. त्यासाठीचे कंटेन्ट आणि साहित्य स्वानंदच्या कार्यकर्त्यांनी देऊ केले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये काही प्रमाणात चैतन्य निर्माण झाले.

वस्तीतील गरजू महिलांसाठी मास्क शिवण्याचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी त्यांना मिळवून देण्यात आली. आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असताना मिळालेल्या या रोजगार संधीमुळे या महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत झाली.

कोरोना नंतर उद्भवलेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी समर्थ भारत पुनर्बांधणी योजने अंतर्गत स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, समुपदेशन इत्यादी विषयांमध्ये सिंहगड रस्ता परिसरात  काम सुरु आहे.

कोरोनानंतरची परिस्थिती सुरळीत व्हावी यासाठी पुणे महानगरात ‘समर्थ भारत पुनर्बांधणी योजना’ सुरू करण्यात आली. रोजगार, कौशल्य, शिक्षण, आरोग्य, समुपदेशन या पाच प्रमुख आयामांच्या माध्यमातून हे कार्य केले गेले. सिंहगड भागातील सहयोगी संस्था म्हणून स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानने सक्रियपणे सर्वच क्षेत्रात पुढाकार घेतला.

1. आरोग्य : आरोग्य विषयांतर्गत वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करणे, आवश्यक ती तपासणी करणे, अर्सेनिक अल्बम, आयुर्वेदिक काढा, नागरिकांचे स्क्रीनिंग करणे, आवश्यक त्यांना पुढील उपचारासाठी तपासणीसाठी पाठवणे, अशा स्वरूपाचे कार्य या आयामाच्या माध्यमातून झाले. रिक्षाचालकांसाठी प्रवासी व चालक यांच्यामध्ये सुरक्षाविषयक काळजीसाठी शिल्ड लावणे असे उपक्रम झाले.

2. रोजगार : रोजगार विषयक माहितीचा आढावा घेण्यासाठी २४ वस्त्यांमधून ९९२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये व्यवसायासाठी ३४३ तर रोजगारासाठी ६७९ नागरिकांनी नोंदणी केली होती. या सर्वांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. याद्वारे ७० नागरिकांना रोजगाराच्या संधीची माहिती करून देण्यात आली तर व्यवसाय करू इच्छिणाऱ्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. याद्वारे एकूण ४५ नागरिकांना व्यवसाय, कर्जाची उपलब्धता याविषयी माहिती देण्यात आली.

3. कौशल्य : या विषयांतर्गत करियर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य या विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

4. शिक्षण : शाळा बंद होत्या. अनेकांकडे शिक्षण घेण्यासाठी ऑनलाईनचे माध्यम उपलब्ध नव्हते. अशा वेळी ३००० विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनशिवाय शिक्षण मिळावे या हेतूने ‘अभ्यासपूरक कृती पुस्तिका’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थाचालकांची बैठक घेऊन वज्र निर्धार अंतर्गत जनजागृती करण्यात आली. या बरोबरच काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यात आले. अभ्यासाचे व्हिडीओ तयार करणे व मुलांपर्यंत पोहोचवणे, पालकांसाठी संवाद सत्राचे आयोजन करणे असे कार्यक्रम घेण्यात आले.

5. विद्यार्थी मित्र : ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय नसणाऱ्या, शालेय पुस्तके नसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या ७० जणांनी नोंदणी केली होती. यामधील ४० विद्यार्थी मित्र सक्रियपणे लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना फोनद्वारे मार्गदर्शन करत होते. या बरोबर १० वी चे विषय राहिले आहेत आणि पुन्हा १० वी ची परीक्षा द्यायची आहे अशा ६ मुलांचा एक गट होता. या गटासाठी मोफत ऑनलाईन क्लासेस सुद्धा या विद्यार्थी मित्रांद्वारे चालविले गेले.

6. समुपदेशन : कोरोना झालेल्या रुग्णांचे व त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करणे, फोनद्वारे व प्रत्यक्ष कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना आरोग्य विषयक काळजी घेण्यास सांगणे. त्यांना असणाऱ्या शंकांचे निरसन करणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे, सोसायटीमध्ये, घरामध्ये सकारात्मक वातावरण राहावे यासाठी सुंदर विचार, गोष्टी, व्हिडीओ ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवणे अशा स्वरूपात हे कार्य झाले.

7. कार्यालय : झालेल्या कामांची नोंद ठेवणे, अहवाल तयार करणे, वृत्त पाठवणे अशा स्वरूपात या आयामाचे कार्य या दरम्यान सुरू होते.