कोविडच्या पार्श्वभूमीवर online शिक्षण सुरू झाले खरे; पण या मुलांकडे कुठे होते स्मार्टफोन..?  ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साधन साहित्यापासुन वंचित असलेल्या अशा विद्यार्थ्यांची फार मोठी संख्या वस्ती विभागात आहे. अशा मुलांना स्क्रिनशिवाय शिक्षण देण्याचे ठरवण्यात आले. या योजनेअंतर्गत तज्ज्ञांच्या सहाय्याने परिसरापासुन, घरातील उपलब्ध साधन-साहित्यापासुन, अनेक सहयोगी विद्यार्थी ,सज्जनगण, पालक यांच्या माध्यमातुन सोप्या पध्दतीच्या अभ्यासपुस्तिका विकसित केल्या गेल्या. दर महिन्याला एक पुस्तिका विद्यार्थ्यांना वितरीत करुन त्याचा पाठपुरावा करणे, आढावा घेणे, आवश्यक तेथे मार्गदर्शन करणे अशी योजना आहे. स्वानंदचे समन्वयक , समृध्दीवर्गाच्या ४५ शिक्षिका तसेच ४५ स्वयंसेवक ‘विद्यार्थी मित्र’ म्हणुन या योजनेत सहभागी आहेत.

हा उपक्रम अतिशय प्रभावी असल्यामुळे शहरातील अन्यही भागात राबवण्यात येत आहे. शिक्षणसंस्थांच्या प्रतिनिधींनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे आणि शाळा पातळीवर याचा उपयोग करून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत.  सध्या या प्रकल्पाच्या माध्यमातून ३००० विद्यार्थी लाभ घेत आहेत व या उपक्रमात १४ सामाजिक संस्था, ७० शिक्षक, ७० विद्यार्थी मित्र सहभागी आहेत.