कोरोना महामारीमुळे अचानकपणे लागलेल्या टाळेबंदीमुळे वस्तीतील अनेक कुटुंबे आर्थिक दृष्ट्या संकटात सापडली. बालसमृद्धी वर्ग बंद पडले, किशोरदर्पण प्रकल्पातील मुलामुलींना भेटणेही दुरापास्त झाले. महिलांचा रोजगार थांबला. अनेक अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाच्या भीतीने आम जनता घरात स्वतःला कोंडून बसलेली असताना स्वानंदच्या कार्यकर्त्यानी मात्र स्वतःची काळजी घेत वस्तीत धान्याचे किट्स पोहचवण्याचे अवघड काम पूर्ण केले. कार्यकर्त्यांनी ३० पेक्षा जास्त वस्त्यामधील आर्थिक दुर्बल घटकातील शेकडो कुटुंब यांच्या धान्य कीट चे वाटप करण्यात आले. या सोबतच वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिरे, अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, आयुर्वेदिक काढा वाटप, सॅनिटरी नॅपकिन वाटप, मास्क वाटप, करण्यात आले. मदत कार्या बरोबरच आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांची नाव नोंदणी करण्यासाठी स्वानंदचे कार्यकर्ते पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीला धावून गेले. मजुरांची नावनोंदणी करून घेणे, त्यांच्या कागद पत्रांची छाननी करणे, त्यांना रांगेत सुरक्षित अंतर ठेऊन नोंदणी करण्यास सांगणे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे ही कामे सर्वांनी केली.
टाळेबंदीदरम्यान समृद्धी वर्गातील शिक्षिका व समन्वयक मुलांच्या सतत संपर्कात राहिले. या कालावधीत मुलाचं मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी १० × १० च्या खोलीत कुटुंबियांना घेऊन खेळता येतील असे खेळ शिकवण्यात आले. त्यासाठीचे कंटेन्ट आणि साहित्य स्वानंदच्या कार्यकर्त्यांनी देऊ केले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये काही प्रमाणात चैतन्य निर्माण झाले.
वस्तीतील गरजू महिलांसाठी मास्क शिवण्याचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी त्यांना मिळवून देण्यात आली. आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असताना मिळालेल्या या रोजगार संधीमुळे या महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत झाली.
कोरोना नंतर उद्भवलेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी समर्थ भारत पुनर्बांधणी योजने अंतर्गत स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, समुपदेशन इत्यादी विषयांमध्ये सिंहगड रस्ता परिसरात काम सुरु आहे.
कोविड महामारीच्या काळात लसीकरण हा एक महत्वाचा विषय स्वानंदने हाती घेतला. स्वानंद, बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक, निरामय, सिरम इन्स्टिट्यूट, पीपीसीआर यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड रोडवरील सर्व वस्त्यांमधील अल्पउत्पन्न गटातील लोकांसाठी लसीकरण आयोजित करण्यात आले. आतापर्यंत 33 वस्त्यांमध्ये, ४१ लसीकरण कॅम्प व १२९२६ लोकांचे लसीकरण झालेले आहे